शिक्षक परिषद शिष्टमंडळाची शिक्षण आयुक्त, संचालकाची भेट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे येथे राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची भेट घेतली. राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वात झालेल्या या भेटीत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्‍या समस्या आणि प्रलंबित प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी याबाबत चर्चा करण्यात आली. कोव्हिड काळात कर्तव्य बजावत असताना कोव्हिड होऊन मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना 50 लाख रुपये विमा कवच मिळण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आलेला आहे, अद्यापही त्यांच्या वारसांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. या रक्कम त्या कुटुंबियांना तात्काळ मिळण्यात यावी तसेच 2005 नंतर शासन सेवेत लागलेल्या प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना शासनाने लागू केली. मात्र गेली 3 वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकाच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तरी मृत्युमुखी पडलेल्या सर्व शिक्षकांच्या कुटुंबीयांना दहा लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान तात्काळ अदा करावे अशा विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. योवळी राज्य नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी, राज्य कार्याध्यक्ष भरत मडके, रायगड जिल्हा कार्यवाह विजय पवार, रायगड जिल्हा संघटनमंत्री वैभव कांबळे, ठाणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी प्रविण शिर्के यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.

Exit mobile version