निजामपूरात हनुमान देवस्थानची यात्रा

| माणगाव । वार्ताहर ।
निजामपूर बाजारपेठ ही इतिहासकालीन आहे. याठिकाणी प्राचीन तलाव आहे. या तलावाचे पाणी कधीही आटत नाही. त्याला बारमाही पाणी असते. निजामपूरपासून जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. तेथूनच पुढे घरोशी, पाचाड मार्गे रायगडच्या किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. निजामपूर बाजारपेठेत प्राचीन कालीन हनुमान देवस्थान असून ते जागृत देवस्थान म्हणून त्याचे आख्यायिका आहे. या हनुमान देवस्थानची यात्रा चैत्र पौर्णिमेत असते. हे जागृत देवस्थान भक्ताच्या हाकेला हमखास पावणारे म्हणून त्याची सर्वदूर ख्याती आहे. या जागृत हनुमान देवस्थानची यात्रा रविवार दि. 9 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी सुरत, मुंबई, पुणे तसेच दूरदूरून यात्रेकरू मोठ्या प्रमाणात येतात अशी माहिती देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फोंडके, उपाध्यक्ष सागर कोळवणकर, यांनी दिली.

निजामपूर येथील हनुमान देवस्थान हे प्राचीन, इतिहासकालीन जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. या हनुमान देवस्थानची यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेत असते. निजामपूर येथील जुने जाणते नागरिकांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे हे जागृत देवस्थान इतिहासकालीन आहे. यापूर्वी हे मंदिर दगड-मातीचे बांधलेले होते. तर छप्परावर पन्हाळी कौले होती. सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. फार वर्षापूर्वी या मंदिरात जत्रा उत्सवासाठी तालुक्यातील गावागावातून जत्रेच्या काठ्या देवस्थानात येत होत्या. त्यावेळी या देवस्थानाची मानाची काठी कोणाची असा प्रश्‍न त्याकाळी नागरिकांना पडला होता. त्यावेळी या जत्रा उत्सवात दूरदूरच्या गावातून आलेल्या काठ्या उभा करण्यात आल्या. त्यावेळी एक-एक काठ्या कलंडून सर्व काठ्या कलंडून गेल्या. मात्र एक काठी न कलंडता उभी राहिली. ती काठी माणगाव तालुक्यातील जावळी गावची कालकाई देवीची मानाची काठी म्हणून उभी राहिली. त्यानंतर जावळी या गावाला निजामपूर हनुमान देवस्थानची मानाची काठी म्हणून शेकडो वर्षापासून मान मिळत आहे.

जावळी गावचे ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे ही परंपरा आजपर्यंत चालूच ठेवली असून जावळीची काठी ही निजामपूर हनुमान यात्रेत मानाची काठी म्हणून तीची भाविक पूजा-अर्चा करतात. त्यामुळे भक्तांना या काठीचे दर्शन मिळते. अशी या देवस्थानची अख्यायिका सांगितली जाते. 10 एप्रिलला सकाळी छबीना उत्सवात ही काठी गावामध्ये फिरवली जाते. त्यानंतर सोमजाई मंदिरापासून परत हनुमान मंदिरात तीची समाप्ती केली जाते. त्यावेळी ज्या काठ्या येतात त्या काठ्यांना शिधावाटप करून समाप्त होतो. हनुमान जयंतीदिनी मंदिरात जन्मोत्सवानिमित्त मंदिरात कीर्तन ठेवण्यात आले होते. या यात्रा उत्सवात सर्व भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे. असे आवाहन देवस्थान संस्थेने केले असून हनुमान जयंती व यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी निजामपूर व परिसरातील वैश्यवाणी, तेलीसमाज तसेच सर्व नागरिक विशेष परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version