। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील ब्रिटिशकाळीन करसनदास मूळजी नगरपरिषद ग्रंथालयाला येथे येणार्या पर्यटकांपैकी अनेक पर्यटक या हैरिटेज वास्तूला आवर्जून भेट देत असतात. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. माथेरानमध्ये फिरण्यासाठी खूप असे पॉईंट्स आहेत. माथेरानचा शोध 1850 साली एका ब्रिटिश अधिकारी यांच्या मार्फत लावण्यात आला. त्यामुळे आजही माथेरानमध्ये अनेक ब्रिटिशकाळीन वास्तू मोठ्या थाटात उभ्या आहेत. यापैकी एक म्हणजे 1897 सालची ब्रिटिशांनी उभी केलेले करसनदास मूळजी ग्रंथालय आजही आपली 125 वर्ष पूर्ण करत ऐटीत उभे आहे. येथील या वाचनायत जुन्या काळातील अमूल्य पुस्तकांचा ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. यामुळेच माथेरानला येणारे अनेक पर्यटक या वाचनालयाला आवर्जून भेट देतात. येथील खूप अशा जुन्या पुस्तकांचा अनमोल ठेवा त्यांना भुरळ घालत असतो. माथेरानला येणारे काही नवीन पर्यटक सुद्धा या वास्तूला भेट देत आपले मनोगत व्यक्त करताना दिसत आहेत. गुजरात येथील पर्यटक देखील माथेरानला आले असता त्यांनी या ग्रंथालयाला भेट दिली. आत्ताच्या इंटरनेट, मोबाईलच्या युगात देखील इतकं सुसज्ज वाचनालय पाहून थक्क झाले. येथील अनेक जुन्या मराठी,हिंदी,इंग्रजी पुस्तकांची भरलेली कपाटे पाहून त्यांना त्यांच्या वाचनाचा मोह आवरला नाही.आणि 125 वर्ष जुने वाचनालय आजही सुस्थितीत आहे ही खूप मोठी प्रशंसनीय बाब आहे असे ते म्हणाले. तसेच माथेरान नगर पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी देखील या पर्यटकांची भेट घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेतले.
आम्ही दरवर्षी उन्हाळी सुट्टीत माथेरान मध्ये येतो येथे आल्यावर आम्ही आवर्जून या ग्रंथालयाला भेट देतो. येथे बसून वाचन करते वेळी आपण मंदिरात असल्याचा आनंद मिळतो. माथेरान येथे फिरण्यासाठी अनेक पॉईंट्स आहेत. आमच्यासाठी वाचनालय हा सुद्धा एक पॉइंटच आहे. त्यामुळे आम्ही न चुकता येथे येतो.
अंकुश सूचक, पर्यटक गुजरात अहमदाबाद