जंजिरा किल्ल्यावर दृष्टीबाधित विद्यार्थ्यांची सफर

स्पर्शाने घेतला भेटीचा आनंद

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ प्रतिष्ठान आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग/दृष्टबाधित विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि.8) ‌‘दुर्ग दर्शन मोहिम’ जलदुर्ग जंजिरा किल्ल्यावर आयोजित करण्यात आली होती. यात नॅबचे 29 विद्यार्थी आणि 4 शिक्षिकांनी सहभाग घेतला होता. जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक चंद्रकांतसाटम यांच्या नेतृत्वाखाली 29 स्वयंसेवकांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली.

शनिवारी सकाळी दहिसर वरून प्रस्थान करून मुरूडमधील एकदरा या ठिकाणी दिव्यांग/दृष्टबाधित विद्यार्थी आणि जिजाऊ प्रतिष्ठानचे स्वयंसेवक समूह एकत्रित जमले. चहा नाश्ता झाल्यानंतर त्यांनी जंजिरा किल्याकडे प्रस्थान केले. या विशिष्ट मुलांच्या मोहिमेची माहिती जंजिरा किल्ल्यातील केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी सहाय्यक संवर्धक बी.जी. येलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे आणि कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान, या मोहिमेत मुलांना शिडाच्या हेलकावणाऱ्या बोटीत चढवणे आणि किल्ल्यावरील प्रवेशद्वारात उतरवणे हे काम जिकरीचे होते. ते आव्हानही सर्वांनी योग्य प्रकारे स्वीकारले. यावेळी किल्ल्‌‍याचा महादरवाजावरील लोखंडी कडी, टोकदार खळेि आपल्या हस्तस्पर्शाने पाहून दुर्ग भ्रमंतीला प्रारंभ केला. पुढे जंजिऱ्याला अजिंक्य ठेवणाऱ्या महाकाय पंचधातुने मढविलेल्या तोफानां हस्तस्पर्श करीत आगळी वेगळी अनुभूती घेतली. यावेळी या अजिंक्य किल्ल्‌‍याचा रंजक इतिहास श्रवण करण्यात विद्यार्थी दंग झाले होते.

यावेळी प्रा. डॉ. मृण्मयी साटम यांनी ऐतिहासिकदस्ताऐवजांचा संदर्भ देत किल्ल्‌‍याच्या गत स्मृतींना उजाळा दिला. या विद्यार्थ्यांनी किल्ल्‌‍याच्या दुर्ग अवशेष हे आपल्याला सोबतच्या स्वयंसेवकांच्या डोळ्यांनी न्याहळत किल्ल्याच्या तटबंदी वरील मार्गावरून किल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली. परतीच्या प्रवासात दुपारी पुन्हा मुलांना जंजिऱ्याच्या महादरवाज्यातील पायऱ्यांच्या जवळ हेलकावणाऱ्या होडीत सुरक्षित पणे चढवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्वांनी जंजिरा किल्ल्‌‍याचा निरोप घेतला. जाता जाता घोंगवणारा वारा, समुद्राची गाज ऐकत ही सर्व मंडळी दांडा राजपूरीच्या किनाऱ्यावर उतरली.

सहली दरम्यान खूप चांगला अनुभव मळािला, स्वयंसेवकांनी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. इतिहास हा प्रेरणादायी होता. शिडाच्या होडीतील प्रवास थोडा भीतीदायक पण तितकाच आनंददायी होता, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंदानी दिल्या. त्यानंतर जिजाऊ प्रतिष्ठान दहिसरचे संस्थापक चंद्रकांत साटम यांनी मोहिमेत सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून मोहिमेचा समारोप केला.

Exit mobile version