अलिबाग पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची विटा पालिकेला सदिच्छा भेट
| विटा | प्रतिनिधी |
विटा नगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे काम कौतुकास्पद आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत तळमळीने कार्य करत आहेत. विटा नगरपालिकेचे सर्व उपक्रम आम्ही आमच्या अलिबाग शहरात राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू, ज्या एकसंघपणे विटा शहरात काम चालू आहे, ते आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी काढले.
अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा व आरोग्य सभापती ॲड. मानसी संतोष म्हात्रे, ॲड. नीलम हजारे, ॲड. अश्विनी ठोसर, ऋषीकेश माळी, जमाल सय्यद, नगरसेवक आब्रे, आरोग्य निरीक्षक तांबे, सुपरवायझर सुमित गायकवाड, आर्या जाधव यांनी विटा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली. प्रारंभी त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र विश्वनाथ कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची भेट घेतली. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व नगरपरिषदेच्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यामध्ये घंटागाडीमार्फत होणारे कचरा विलगीकरण, पीट कंपोस्टिंग प्रक्रिया, प्लास्टिक श्रेडिंग मशीन, बेलिंग मशीन, डेंसिफायर मशीन, रोटरी ड्रम कंपोस्टर, बायोगॅस प्लांट, एफ.एस.टी.पी. प्लांट तसेच रेमिडिएशन साईट यांची सखोल माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे व आरोग्य अधिकारी संतोष लोखंडे (सी.सी.) यांनी मान्यवरांचे घनकचरा डेपो येथे स्वागत केले. प्रकल्पातील कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व मान्यवरांना सेंद्रिय खत पॅकेट भेट स्वरूपात देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले तसेच विटा नगरपरिषदेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांनी विटा नगरपरिषदेचे घनकचरा व्यवस्थापन कार्य अत्यंत उत्कृष्ट व आदर्श असल्याचे नमूद केले. प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आले. बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे, नगरसेवक संजय भिंगारदेवे, नगरसेवक अविनाश शितोळे व युवा नेते रोहित पाटील, विक्रम पंडित उपस्थित होते.
