जिल्हा कारागृहाचा स्तुत्य उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कारागृहातून सुटका झाल्यावर बंद्यांना रोजगाराचे साधन खुले व्हावे, म्हणून अलिबागमधील जिल्हा कारागृहामार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाचा स्तुत्य उपक्रम कारागृहामध्ये राबविण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, 35 हून अधिक बंद्यांनी सहभाग घेऊन व्यावसायिक धडे घेत आहेत.
गुन्हेगारापासून बंदी दूर राहवे, त्यांना रोजगाराचे दालन निर्माण व्हावे. रोजगाराच्या माध्यमातून कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा, हा उद्देश समोर ठेवून अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व विषेश कारागृह महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली बंद्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. अलिबागमधील जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट यांच्यामार्फत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअरिंगचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. कारागृहातील 35 बंद्यांनी प्रशिक्षणात उस्फूर्तपणे सहभाग घेतला असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून एसी, फ्रिज, वाशिंग मशिन, टिव्ही, मिक्सर, ग्रांईडर, गिझर हिटर,आदी वस्तूंच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण बंद्यांना देण्यात येणार आहे.
