जीटीसीसीकडून शिक्कामोर्तब
| पणजी | वृत्तसंस्था |
गोव्यात सध्या सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 ऐवजी 42 खेळ असतील, यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. स्पर्धा तांत्रिक आचार समितीने व्हॉलीबॉल-बीच व्हॉलीबॉल खेळाला स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातून वगळले. हँडबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबतही संभ्रम आहे. व्हॉलिबॉलचा स्पर्धेत समावेश नसेल, हे आम्हाला तोंडी कळविण्यात आले आहे. अधिकृतपणे लवकरच कळविले जाईल, असेही सांगण्यात आले.
जीटीसीसी यांच्यातर्फे स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक बुधवारी सकाळी आम्हाला मिळाले, त्यात व्हॉलिबॉल खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही, असे गोव्याचे स्पर्धा आयोजक संदीप हेबळे यांनी सांगितले. जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांच्याशी संपर्क केला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकाच्या यादीत न्यायालयीन प्रक्रियेत असलेला हँडबॉल आणि वाद असलेल्या स्क्वे मार्शल आर्ट या खेळांचाही समावेश नाही; पण हे दोन्ही खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत आयोजन होईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे हेबळे यांनी नमूद केले.
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी. उषा सध्या गोव्यात आहेत. व्हॉलिबॉल समावेशासंदर्भात गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आयओएशी पत्रव्यवहार केला होता; मात्र आयओएला व्हॉलिबॉलबाबत संभाव्य खटला टाळायचा आहे. उषा यांनी व्हॉलिबॉलचा समावेश अशक्य असल्याचे आपल्याला सांगितले असून या घोषणा लवकरच अधिकृतपणे होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली. देशातील व्हॉलिबॉलचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने नियुक्त केलेल्या अस्थायी समितीने गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. आता जीटीसीसीने हा खेळ वेळापत्रकातून वगळल्याने व्हॉलीबॉल व बीच व्हॉलीबॉल हे दोन्ही क्रीडाप्रकार 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नसतील. यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटात प्रत्येकी आठ संघ कमी वेळ उपलब्ध असल्याने निवडता येणार नसल्याचे कारण अस्थायी समितीने दिले आहे.