| महाड | सुजित धाडवे |
मुंबई-गोवा महामार्गालगत, ऐतिहासिक महाड तालुक्यात सावित्री नदीच्या विस्तीर्ण तीरावर दिमाखात उभा असलेला आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला ऐतिहासिक किल्ले दौलतगड (दासगाव) यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनी एका क्रांतीकारी उपक्रमाचा साक्षीदार ठरला. एका बाजूला ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि भगव्या झेंड्यांच्या अथांग सागरात मुख्य किल्ले रायगडावर शिवछत्रपतींच्या अलौकिक सार्वभौमत्वाचा सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होत असताना, त्याच्याच सावलीत असलेल्या या दौलतगडावर मात्र, दुर्गसेवकांनी केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून आपली निष्ठा सिद्ध केली. दौलतगड दासगाव प्रतिष्ठान आणि ‘रॉयल रायगडकर प्रतिष्ठान’ च्या दुर्गसेवकांनी या पवित्र दिवशी एकत्रित येत विशेष श्रमदान आणि गड संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवून महाराष्ट्राला शिवभक्तीची एक नवी दिशा दाखवून दिली आहे.
आजच्या काळात शिवरायांची नवीन स्मारके किंवा पुतळे बांधण्यापेक्षा, त्यांनी रक्ताचे पाणी करून निर्माण केलेले गडकिल्ले वाचवणे आणि त्यांचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे, हा अत्यंत परिपक्व विचार घेऊन हे दुर्गसेवक कार्यरत आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असूनही सध्या काहीशा उपेक्षित राहिलेल्या या दौलतगडाला तरुणांच्या जिद्दीमुळे आणि अविरत कष्टामुळे लवकरच पुन्हा नव्याने गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हातात झाडू, कुदळ आणि पाटी घेऊन जेव्हा हे तरुण गडावर घाम गाळतात, तेव्हा तो केवळ परिसर स्वच्छ होत नसतो, तर इतिहासाच्या पाऊलखुणा जिवंत होत असतात.
या मोहिमेचे आणखी एक मोठे यश आणि दिशादर्शक वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ तरुणच नव्हे तर लहान मुले आणि चिमुकले बालमावळेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जे वय खेळण्याचे-बागडण्याचे, त्या वयात ज्येष्ठ दुर्गसेवकांकडून या बालकांवर थेट गडाच्या मातीतच संवर्धनाचे संस्कार केले जात आहेत. बालवयातच लागलेली ही गोडी पुढे अनेक वर्षे महाराष्ट्राची गौरवशाली दुर्ग संवर्धनाची परंपरा अखंड चालू ठेवण्यास नक्कीच मदत करणार आहे. ज्यांना रायगडावरील मुख्य सोहळ्याला जाणे गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे शक्य नाही, त्यांनी निराश न होता आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या कोणत्याही उपेक्षित गडावर जावे, तिथे श्रमदान करावे आणि शिवराज्याभिषेकाचा खरा, सुखद सोहळा अनुभवावा, असे आवाहन याप्रसंगी दुर्गसेवकांनी केले.
दौलतगडावरील ही मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताला विचार करायला लावणारी आहे. उत्सव आणि सोहळे नक्कीच व्हावेत, पण त्या सोहळ्यांचे रूपांतर जर अशा श्रमदान आणि संवर्धन मोहिमांमध्ये झाले, तर महाराष्ट्राचे वैभव असलेले शेकडो गडकिल्ले पुन्हा एकदा दिमाखात उभे राहतील. दौलतगडाच्या मावळ्यांनी दाखवलेली हीच ती दिशा आहे, ज्या वाटेने जाऊन आपण शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्य’ खऱ्या अर्थाने जपू शकतो!
घोषणांपेक्षा शिवरायांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच खरी शिवभक्ती आहे. मुख्य गडांवर जाऊन केवळ गर्दी वाढवण्यापेक्षा, आपल्या परिसरातील उपेक्षित किल्ल्यांना श्रमदानातून गतवैभव मिळवून देणे हेच आजच्या काळातील खरे शिवकार्य आहे.
निलेश निवाते
संस्थापक अध्यक्ष, दौलतगड दासगाव प्रतिष्ठान
शिवरायांचा इतिहास पुस्तकात वाचण्यापेक्षा गडकिल्ल्यांच्या दगडा-धोंड्यांमधून अनुभवण्याचा आहे. तरुण पिढीने सोशल मीडिया सोडून हातात झाडू आणि कुदळ घेऊन गडावर घाम गाळणे, हाच खरा मावळा तयार होण्याचा मार्ग आहे.
कर्तव्य जाधव
अध्यक्ष, रॉयल रायगडकर प्रतिष्ठान
दौलतगड संवर्धन हे आमचे आद्य कर्तव्य आहे. जिथे आपल्या पूर्वजांचा इतिहास दडलेला आहे त्या दौलतगडाचे संवर्धन आपल्या हातून घडतंय हे आमचे सौभाग्य आहे. इथला इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आम्ही सदैव प्रयत्न करू.
मनीषा निवाते
दुर्गसेविका
