| पनवेल | प्रतिनिधी |
मतदारयादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सुरु करण्यात आलेल्या मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामासाठी खारघरमधील काही शाळांमध्ये वर्गखोल्यांचा वापर करण्यात येत असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी एकाच वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणी सुरु असताना त्याच खोलीत दुसऱ्या बाजूला निवडणुकीसंबंधी कागदपत्रांची पडताळणी, अर्ज स्वीकारणे आणि इतर प्रशासकीय कामे सुरु आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, वर्गातील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी करण्यासाठी 30 जून पासून बूथ लेव्हल अधिकारी (जीएलओ) मार्फत एसआयआर मोहीम सुरु आहे. दरम्यान, एसआयआर मोहीमसाठी नेमणूक केलेल्या प्रगणकांनी घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश बीएलओ शाळेत ठाण मांडून बसले आहेत. काही ठिकाणी एकच वर्ग खोली असल्यामुळे एकीकडे शिक्षक मुलांना धडे देत असल्याचे तर दुसरीकडे निवडणुकीच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची सततची ये-जा, चर्चा आणि गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकामध्ये नाराजी पसरली असून, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे केंद्र असून निवडणुकीसारखी प्रशासकीय कामे स्वतंत्र सभागृह, समुदाय भवन किंवा अन्य शासकीय इमारतीत करणे अपेक्षित आहे. शाळांमध्ये शिकवणी आणि निवडणुकीची कामे एकाच वेळी सुरु ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो, असे पालक म्हणाले.
प्रशासनाने तातडीने शाळांमधील ‘एसआयआर’ची कामे स्वतंत्र ठिकाणी वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करावीत किंवा विद्यार्थ्यांच्या अध्यापनात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





