चालकाच्या प्रसंगावधानामुळे 14 प्रवासी सुखरूप
। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि.24) सकाळी उदयपूर (राजस्थान) येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. पनवेल हद्दीतील रिसवाडी गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 14 प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमपी 44 झेडबी 6776 क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन उदयपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी सकाळी सुमारे 7.45 वाजण्याच्या सुमारास बस रिसवाडी गावाजवळ आली असता बसच्या वातानुकूलित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघू लागला.
चालक छत्रपाल सिंग यांना गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत बस तातडीने महामार्गाच्या कडेला थांबवली. त्यानंतर सर्व 14 प्रवाशांना तात्काळ बसमधून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडत असतानाच आगीने अचानक रौद्ररूप धारण केले आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस, आयआरबीची देवदूत रेस्क्यू टीम, पनवेल महानगरपालिकेचे तसेच खोपोली नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत ट्रॅव्हल्स बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे सामानही जळाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व 14 प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. प्रशासनाच्या मदतीने प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
या घटनेमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. आग आटोक्यात आणल्यानंतर जळालेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. आगीचे नेमके कारण काय होते, याचा रसायनी पोलीस अधिक तपास करत आहेत.






