। नेरळ । प्रतिनिधी ।
मुंबई-कर्जत-खोपोली उपनगरीय रेल्वे मार्गावरील पळसदरी स्थानकाजवळ रूळ ओलांडताना मेल एक्सप्रेसची धडक लागून एका रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाला. सखाराम मारुती हिलम असे मृत प्रवाशाचे नाव असून ते वासरे खोंडा परिसरातील शिरसे येथील आदिवासी वाडी येथे राहत होते. ते नेहमीप्रमाणे पळसदरी स्थानकावरून लोकलने खोपोली येथे नोकरीसाठी जात होते. खोपोली लोकल पकडण्यासाठी रूळ ओलांडत असताना पुण्याकडून येत असलेल्या मेल एक्सप्रेसची त्यांना धडक बसली. ही घटना पळसदरी प्लॅटफॉर्मपासून सुमारे 200 मीटर अंतरावर घडली. कर्जत रेल्वे पोलिसांनी तातडीने जखमी अवस्थेत असलेल्या हिलम यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.







