। चिरनेर । प्रतिनिधी ।
मावळ लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे राजाराम पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली होती. 76 हजार मते मिळवून पाटील तिसर्या स्थानावर होते. या निवडणुकीत मात्र वंचितची साथ सोडून ‘वोट भी दो,नोट भी दो’चा नारा देत देशासमोर असलेला बसपाचा तिसरा पर्याय मतदारांनी निवडावा, असे आवाहन राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला समर्थन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वंचितची भुमिका पटली नसल्याने राजाराम पाटील यांनी बहुजन समाज पार्टीचा पर्याय निवडला आहे. बसपानेही मावळ लोकसभेची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. व्यवसायाने शिक्षक, शेतकरी, मच्छीमार असलेल्या पाटील यांनी अनेक लढ्यात सहभागी होऊन संघर्ष केला आहे. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या कामाची आणि मागील लोकसभा निवडणुकीत तिसर्या क्रमांकाची मते याची दखल घेऊनच बहुजन समाज पार्टीने राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांच्या न्याय हक्कासाठी बसपाच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहोत. सिडको, जेएनपीए, एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या कवडीमोल भावाने जमिनी घेऊन मोठ्या भावाने विक्री करीत शेतकर्यांची फसवणूक केली आहे. मावळ मतदारसंघ अरबी समुद्राला व विविध डोंगराला जोडणारा आहे. या मावळ मतदारसंघातील श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे-पाटील या दोघांनाही समुद्रातील काय कळत आहे, असा सवालही राजाराम पाटील यांनी केला आहे.







