| पेण | प्रतिनिधी |
32 रायगड लोकसभा मतदारसंघातील 191 पेण विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी शेजाळ तहसीलदार पेण, प्रसाद कालेकर नायब तहसीलदार पेण यांच्या निर्देशानुसार पेण तालुका स्वीप पथकाच्या मदतीने सौ. म.ना. नेने कन्या विद्यालय व प्रायव्हेट हायस्कूल पेण येथील प्रा. अंजली जोशी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासोबत दि. 28 ते 30 मार्च मतदान जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली व विद्यार्थ्यांना संकल्प पत्र वाटप करण्यात आले.
सदर संकल्प पत्र विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना देऊन मतदान जागृती करायवयाची आहे, असे आवाहन करण्यात आले. पेण तालुक्यातील जवळपास सर्वच कुटुंबात मुलांच्या माध्यमातून असे संकल्प पत्र पाठविण्यात येत आहे. तसेच नगरपालिका हद्दीतील घंटागाड्या व आसपासच्या गावातील आंबेघर, डोलवी, मळेघर, दुष्मी, कांदळे, वडखळ, कामार्ली या ग्रामपंचायत घंटागाड्यांवर मतदान जनजागृतीसंदर्भात जिंगल्स, ध्वनीफीत दररोज वाजविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. पेण शहरात तसेच गावांमध्ये विविध ठिकाणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी पतंगराव कदम कॉलेज पेण तसेच, शासकीय विद्या निकेतन पेण येथे विद्यार्थ्यांची रॅली व ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. एकूणच, पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचे वातावरण तयार व्हायला मदत होत आहे.