। सावंतवाडी । वृत्तसंस्था ।
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध मतदार जनजागृती उपक्रम घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात नगरपरिषदेमार्फत मतदान जनजागृती दुचाकी रॅली काढत प्रबोधन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नगरपरिषदेमार्फत सेल्फी पॉईंट, हस्ताक्षर मोहीम, रांगोळी प्रदर्शन, मतदान शपथ, आरोग्य विभागाच्या घंटागाडीद्वारे मतदान जागृतीबाबतची गाणी वाजविणे आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याच्यादृष्टीने उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील जास्तीत जास्त युवा मतदारांमध्ये जागृतीसाठी जिमखाना स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, जिम, शाळा व महाविद्यालये, तसेच शिवउद्यान, बोट क्लब सेल्फी पॉईंट येथे मतदान जागृतीसाठी सेल्फी पॉईंट व मतदार शपथच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली. या निमित्ताने आज नगरपरिषदेमार्फत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सकाळी 8 वाजता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान येथून मुख्याधिकार्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या रॅलीद्वारे शहरातील विविध भागांमध्ये फिरून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, रोटरी क्लब, लायन्स क्लब व इतर अशासकीय संस्थांचे पदाधिकारी, तसेच शहरातील विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी, नागरिक व पत्रकारांनी सहभाग नोंदविला. दुचाकी रॅली संपल्यानंतर जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यानासमोरील मोकळ्या जागेत सर्वांना मतदार शपथ देण्यात आली.