। अलिबाग । प्रतिनिधी ।
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी प्रदक्षण महादेव कोळी याला नवी मुंबई येथील न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उरण तालुक्यातील फुंडे येथील महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. 15 जानेवारी 2019 रोजी दुपारी कॉलेजमधून ती घरी जात होती. दरम्यान, आरोपी प्रदक्षण कोळी याने तिला रस्त्यात गाठले. तिला बळजबरीने त्याच्या स्कुटीवर बसवून त्याच्या पनवेलमधील केलवणे येथील घरी नेले. त्यानंतर रेतीबंदर, नेरुळ, कार्ले व लोणावळा येथे घेऊन गेला. याप्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा शोध सुरु केला. अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले. पीडित मुलीला ताब्यात घेतले. त्याला अटक करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विकास बडे यांच्या न्यायालयात झाली. अभियोग पक्षातर्फे सुरुवातीला सरकारी वकील अंकुश कदम व विशेष सकरारी वकील साजिया छापेकर यांनी तर पुढील कामकाज व युक्तीवाद सतीश नाईक यांनी केला. फिर्यादी, पीडित मुलगी व इतर साक्षीदारांच्या पुराव्यानुसार आरोपीला दोषी ठरवत प्रदक्षण कोळी याला सश्रम कारावास, पंधरा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद तसेच दंडातील दहा हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याची शिक्षा सुनावली.