एक लाख सहा हजार 155 जणांनी केली नोंदणी
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मतदानकार्डमधील त्रुटी दूर करण्यासाठी तहसील कार्यालय, तलाठी, बीएलओकडे जाणे, त्यांना सर्व कागदपत्रे देणे, त्यानंतर मतदान कार्डमधील चुकीची दुरुस्ती करणे या धावपळीतून सुटका करण्यासाठी निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा अधार घेत व्होटर हेल्पलाईन ॲप सुरु केले आहे. मोबाईलच्या एका क्लीकवर घरबसल्या मतदान कार्डची दुरुस्ती करता येणे शक्य झाले आहे. या ॲपचा मतदारांना अधार मिळाला असून जिल्ह्यातील एक लाख सहा हजार 155 जणांनी या ॲपमार्फत नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
सुरुवातीच्या कालावधीत मतदान ओळखपत्र साध्या पध्दतीने होते. ते हाताळताना मतदारांना अडचणी जाणवत होत्या. निवडणूक आयोगाने ओळखपत्र सहजरित्या हाताळता यावे यासाठी स्मार्ट कार्डची सुविधा सुरु केली. मतदारांना रंगीत छायाचित्रासह स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. मतदान ओळखपत्रामध्ये नाव, आडनाव, पत्ता, लिंग तसेच छायाचित्र अशा अनेक प्रकारच्या त्रुटी निर्माण झाल्याने मतदान कार्डमधील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
तसेच काही वेळा तहसील कार्यालयातदेखील दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. त्यामुळे मतदारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाया जाऊ लागला. किरकोळ कारणासाठी तालुका, जिल्हयाच्या ठिकाणी ये-जा करावी लागत. मतदारांची होणारी ही वणवण थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने हायटेक होत व्होटर हेल्पलाईन ॲप सुरु केला. हा ॲप ॲन्ड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्लेमधून डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर घरबसल्या मतदार मतदान कार्डमधील असलेली दुरुस्ती करू शकतो अशी व्यवस्था सुरु केली. गेल्या चार वर्षापासून सुरु झालेल्या या ॲपला जिल्ह्यातील तरुण मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख सहा हजार 155 मतदारांनी मोबाईलच्या एका क्लीकवर ॲपच्या माध्यमातून मतदार नोंदणी व मतदानकार्डवरील झालेली चुकीची दुरुस्ती केली असल्याचे आकडेवारीनुसार मिळाली आहे.
निवडणूक विभागाने व्होटर हेल्पलाईन ॲप सुरु केले आहे. या ॲपचा फायदा खुप चांगला होत आहे. मतदान कार्डमधील असलेली दुरुस्ती या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या एका क्लीकवर करता येते. त्यामुळे होणारी धावपळ, व वेळ वाचण्यास मदत झाली आहे.
सागर जाधव, मतदार
50 टक्के अधार लिंक प्रलंबित
मतदान कार्डमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी. बोगस मतदार रोखण्यासाठी जिल्हयात मतदान कार्ड अधार लिंक करण्याचे काम जोमाने सुरु आहे. जिल्हयातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदार संघात एकूण 22 लाख 82 हजार 616 मतदार आहेत. त्यामध्ये 11 लाख 55 हजार 198 मतदारांनी आधार लिंक केली आहे. म्हणजे 50.6 टक्के अधार लिंक झाली आहे. उर्वरित 11 लाख 27 हजार 418 (49.4 टक्के) जणांची अधार लिंक करणे प्रलंबित असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे .