मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन स्पर्धा; लक्ष्मी शर्माची अंतिम फेरीसाठी निवड
| चिरनेर | वार्ताहर |
उरणमधील एका लादी कारागिराच्या मुलीचा प्रवास मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-2023 च्या अंतिम दिशेने होऊ लागला आहे. लंडनमध्ये 26 मे रोजी होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत लक्ष्मी शर्मा हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक काका पाटील यांनी लक्ष्मीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजस्थानमधून 1985 साली रोजगारनिमित्ताने आलेला गणेश शर्मा हा सामान्य इसम उरण-मोरा इथे स्थायिक झाला. मिळेल ते मजुरीचे काम करणाऱ्या गणेश शर्मा यांनी लादी कारागीर म्हणून लौकिक मिळविला. लक्ष्मी ही त्यांचीच मुलगी. तिचा जन्म आणि शिक्षण उरणमध्येच झाले. नवी मुंबईत सीएचे शिक्षण घेतले. शिक्षणातील हुशारीच्या जोरावर लंडनमध्ये एनएचएस कंपनीत सीए म्हणून नोकरी करीत आहे. डॉ. योगेश कौशिक यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या लक्ष्मीने संगीत-नृत्याची धडेही गिरवले आहेत. विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमात सहभागी होत लक्ष्मीने काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतही केली आहे.
अशा या चौफेर व्यक्तिमत्त्व असलेल्या लक्ष्मीने लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-2023 स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची येत्या 26 मे रोजी अंतिम फेरी होणार आहे. या अंतिम फेरीसाठी लक्ष्मीची निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल आई-वडील, निकटवर्तीय व कौटुंबिक सहकारी मित्र काका पाटील यांच्यासह विविध स्तरांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.