| रसायनी | वार्ताहर |
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा संजोग वाघेरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. कासारवाडी येथे झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणे यांनी, माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहीत नाही, असे विधान करत संजोग वाघेरे यांना महत्व देत नसल्याचे दाखवून दिले होते. परंतु, आता बारणे यांच्या विधानाचा संजोग वाघेरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. इतकेच नाहीतर वाघेरेंनी बारणेंवर जहरी टीका सुद्धा केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही बाजूंनी युती आणि आघाडीत घटक पक्षांचे मेळावे घेणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद करणे या प्रक्रियेला जोर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य होईल, तिथे तिथे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात.
बारणे यांचे विधान हे बालिशपणाचे असून 1987 सालापासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात आहोत. तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे. अशा शब्दात वाघेरे यांनी बारणेंचा समाचार घेतला. इतकेच नाही तर संजोग वाघेरे यांनी रावणाचे उदाहरण देत रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये. बारणेंच्या अहंकाराचा मतदार अंत करतील, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.