आता वर्षातून चार वेळा ‘मतदार नोंदणी’ करता येणार; केंद्र सरकारद्वारे अधिसूचना जारी

केंद्र सरकारने मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एक ऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणे, इत्यादी तरतुदींचा समावेश आहे.

संसदेने पारित केलेल्या निवडणूक दुरुस्ती कायदा २०२१ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट द्वारे माहिती दिली. याबाबत ते म्हणाले की, निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात चार अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. आता १ जानेवारी किंवा १ एप्रिल किंवा १ जुलै किंवा १ ऑक्टोबर रोजी १८ वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्यासाठी तत्काळ अर्ज करू शकतात.

केंद्रीय मंत्र्यांनी एक तक्ताही शेअर केला आहे, ज्यामध्ये नमूद केले आहे की, यामुळे एकाच व्यक्तीला एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. तसेच निवडणूक आयोग आता निवडणूक संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल व निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही इमारतीची मागणी करण्याची शक्यता आहे. या अधिसुचना लवकरात लवकर अमलात आणल्या तर तरुणांना वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करणे, सोपी जाणार.

Exit mobile version