खारघर, तळोजा परिसरात रोख रक्कम वाटपाचे प्रकार उघड
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांना घरपोच पैसे वाटप करून मते खरेदी केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. खारघर आणि तळोजा परिसरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून रोख रक्कम वाटप केल्याचे निदर्शनास आले असून, निवडणूक विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली आहे.
बुधवारी सायंकाळी खारघर परिसरात शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) कार्यकर्त्यांनी काही जणांना पैसे वाटप करत असल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली. त्यानंतर तळोजा परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सव्वा लाख रुपयांची रोकड वाटप करत असताना एका कार्यकर्त्याला निवडणूक विभागाने ताब्यात घेतले. या घटनेनंतर अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने पाकिटांतून मतांची खरेदी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे वाटप करणे हा फौजदारी गुन्हा असला तरी या गुन्ह्यात कठोर शिक्षा होत नसल्याने अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचे बोलले जात आहे.
मताला दोन ते तीन हजारांचा दर
पनवेल पालिका निवडणुकीत चार मतांसाठी दोन ते तीन हजार रुपयांचा भाव असल्याची चर्चा असून, अनेक पक्ष आर्थिक बळावर निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग 19 मध्ये शाब्दिक वाद
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 19 मध्ये शेकाप आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना समज दिली.
याच प्रभागात दुबार मतदानाच्या संशयावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. एका मतदारावर दुबार मतदानाचा आरोप करत त्याला लॉकअपमध्ये टाकण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. मात्र, मतदाराला धमकावणे चुकीचे असल्याचा प्रतिवाद भाजप कार्यकर्त्यांनी केल्याने वातावरण तापले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.
शिस्तबद्ध मतदान, चोख पोलीस बंदोबस्त
सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी कमी असली तरी मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध सुरू होती. वृद्ध, दिव्यांग आणि महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कामावर जाण्यापूर्वी अनेक मतदारांनी मतदानाला प्राधान्य दिले. मात्र, काही मतदारांची नावे मतदान यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच परतावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.







