लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी

विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

| यवतमाळ | वृत्तसंस्था |

जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी लोकसभेकरिता मतदान होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यवतमाळ आणि वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत प्रचाराचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विविध अनुभवांना सामोरे जावे लागले.

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यावर त्या स्थानिक उमेदवार नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे स्वत:ला कुणबी असल्याचे सांगून मतदारांची फसवणूक करीत असल्याचा थेट आरोप महायुती उमेदवाराच्या प्रचारसभेत मंचावरून झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे विकासाच्या चर्चेवर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कुठलेचे मुद्दे नाहीत. दोन्ही उमेदवार प्रथमच थेट लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने यापूर्वी त्यांनी मतदारसंघासाठी काय केले, याचा कोणताच लेखाजोखा दोन्ही उमदेवारांकडे नाही.

आघाडीचे संजय देशमुख हे दोनदा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते. मात्र, त्या काळात त्यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस काम केले नसल्याचे नागरिक सांगतात. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे सामाजिक आणि सहकार क्षेत्रात योगदान आहे. मात्र, मतदारसंघ म्हणून ठोस काम कोणते सांगावे, हा पेच त्यांच्या समर्थकांपुढेही आहे.

दोन्ही उमेदवारांचे समर्थक प्रचारासाठी गावागावात फिरत असताना त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नेर तालुक्यात गेलेल्या स्वयंसेवकांना नागरिकांनी, ‘जिल्ह्याबाहेरचा उमेदवार आमच्यासाठी काय करणार’, असा थेट प्रश्‍न विचारला. त्या यवतमाळच्या लेक आहे, त्यांचा सन्मान करूच, पण आम्ही बसून आहो तो बेंचसुद्धा संजय देशमुख यांनी दिला, राजश्री पाटील यांनी आमच्या गावाला काय दिले, असे म्हणत प्रचारकांना गप्प केले. दुसरीकडे, महायुतीच्या दिग्रस येथील सभेत बोलताना महायुतीचे समर्थक अबू पाटील यांनी, कुणब्यांना संपविणारा लबाड व्यक्ती म्हणजे संजय देशमुख, असा थेट वार केला. आमदार असताना त्यांनी समाजाला सर्वाधिक त्रास दिला, अशी खंत बोलून दाखविली. लोकांच्या मतांसाठी ते कुणबी असल्याचे खोटे सांगून फसवित असल्याचा आरोपही पाटील यांनी देशमुख यांच्यावर केला आहे. या दोन्ही प्रसंगांच्या चित्रफिती जिल्ह्यात प्रचंड प्रसारित झाल्या असून, यावरून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.

Exit mobile version