एकाच ‘बॅलेट’वर असणार झेडपी व पंचायत समितीचेही उमेदवार
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 गटांसाठी 173 तर 15 पंचायत समित्यांमधील 118 गणांसाठी 329 उमेदवार आहेत. मतदान केंद्रांवरील एका बॅलेट मशीनवर 12 उमेदवारांची नावे, चिन्ह असतील. त्यात पहिल्यांदा पांढऱ्या रंगातील नावे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची आणि त्याखाली गुलाबी रंगातील उमेदवार पंचायत समितीचे असणार आहेत. प्रत्येक मतदाराने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रत्येकी एक अशी एकूण दोन मते द्यावी लागणार आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर गावागावांतील मतदार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदारास दोन मते द्यावी लागतील. मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या यंत्रणेमार्फत बॅलेट मशीन संदर्भातील माहिती मतदारांपर्यंत पोहोचवीत आहेत. तहसीलदारांनी मतदान कसे करायचे, एकाच मशीनवरील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार कसे ओळखावे, याचे मार्गदर्शन केले आहे. बॅलेटवर जिल्हा परिषद गटाची मतपत्रिका पांढऱ्या रंगात असेल, त्यावर मतदाराच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची नावे, चिन्हे असतील. दुसरीकडे त्याच मशीनवर पंचायत समितीची मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. त्यावर मतदाराच्या पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे व चिन्हे असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. एकाच बॅलेट मशिनवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उमेदवारांची नावे व चिन्हे असणार आहेत. प्रत्येक मतदाराला दोन मते (एक पंचायत समिती व एक जिल्हा परिषदेचा उमेदवार) द्यावी लागणार आहेत.
विक्रम पाटील,
तहसीलदार, अलिबाग
.. तर बाकीचे उमेदवार दुसऱ्या बॅलेटवर
एका बॅलेट मशीनवर 12 उमदेवारांची नावे, चिन्हे बसतात. जिल्हा परिषदेच्या एका गटात व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या गणातील उमेदवार 12 पेक्षा जास्त असतील, तर 12 च्या पुढील पंचायत समितीचे उमेदवार दुसऱ्या मशीनवर असतील. मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह शोधून दोन्ही उमेदवारास प्रत्येकी एक-एक मत टाकायचे आहे. उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह आणि त्यापुढे बटण असणार आहे.






