आदिवासी भागात मतदान जनजागृती

। नेरळ । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण झुगरेवाडी गावामध्ये प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातामध्ये मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश हे स्थानिकांचे लक्ष वेधून घेत होते.

या मतदान जनजागृती रॅलीमध्ये भाऊ झुगरे, वसंत पारधी तसेच नाथा झुगरे, जनार्दन पारधी, सुनील सावळा, गणपत केवारी, गणपत झुगरे, सतीश घावट, नंदादीप चोपडे, राजश्री पाटील आदी सहभागी झाले होते.

यावेळी सेवा सहयोग फाउंडेशनचे निनाद आल्हाट यांनी ग्रामस्थ आणि पालकांना संबोधित करून मतदान करणे का गरजेचे आहे? एका मताने काय फरक पडतो? असा विचार आपण करत असतो याबद्दल माहिती देण्यात आली. अनेक लोक मतदानाला जाणे टाळतात, परंतु देशाच्या जडणघडणीमध्ये आपल्या एका मताचे मोल हे अमूल्य आहे. त्यामुळे मतदान करताना सजग राहून मतदानाचे पवित्र कार्य करावे असे आवाहन केले. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे व ते आपण सदैव पार पाडले पाहिजे असे आवाहन केले. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकांना मोठ्या प्रमाणावर मतदारांचा प्रतिसाद लाभतो. परंतु, तुलनेने लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र तितकाचा प्रतिसाद मतदारांचा लाभत नाही. हे चित्र बदलून जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी आपण सजग मतदार म्हणून काम करणे गरजेचे आहे यासाठी मतदार जनजागृती रॅली काढली जात आहे.

Exit mobile version