। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीची चार जागांसाठी निवडणूक आज (दि.18) होत असून या निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होणार असून सर्वत्र प्रशासन सज्ज झाले आहे. 4 वार्डातील होणार्या या निवडणुकीसाठी एकूण 3325 इतके मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार 1695 तर स्त्री मतदार 1630 इतके आहेत. शहरातील चार मतदान केंद्रातून ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
माणगाव नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून 17 नगरसेवक पदाची संख्या आहे. 13 जागांसाठी यापूर्वीच 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले असून उर्वरित वार्ड क्र.6, 8, 14 व 17 या वार्डांतील चार जागांसाठी आज मतदान होत आहे. या नगरपंचायतीवर गेल्यावेळी 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळविली होती. दुसर्यांदा होणार्या या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना,काँग्रेस, भाजप यांनी एकत्रित येत माणगाव विकास आघाडी तयार केली असून मनसे, शेकाप व अपक्ष उमेदवार काही वार्डांतून आपले नशीब अजमावत आहेत. चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत गेली वीस ते पंचवीस दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माणगाव विकास आघाडीकडून प्रचार सभेत आरोप – प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
या माणगाव नगरपंचायतीच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाकरिता 3 पोलीस अधिकारी, 37 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. माणगाव नगरपंचातीच्या या एकूण 17 जागांची मतमोजणी बुधवारी (दि.19)निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या अधिपत्याखाली सुरुवात होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार ते मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या लक्ष वेधून आहे.