21 डिसेंबरला एकत्रित निकाल; आयोगाच्या कारभारावर विरोधकांचे ताशेरे
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे 2 डिसेंबर रोजी मतदान होऊन 3 डिसेंबरला निकाल लागणार होता. मात्र, आता तो रद्द करण्यात आला आहे. न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे 24 नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. आता 20 डिसेंबर रोजी उर्वरित नगरपरिषदांची निवडणूक आणि 21 डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषदांचा निकाल एकत्रित लावण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक पुढे ढकलण्याची करामत निवडणूक आयोगाने केल्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. आयोगाच्या ढिसाळ कारभारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवली आहे.
एकतर नगर पालिका निवडणुका पाच-पाच वर्षे रखडलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि उमेदवार निवडणुकीची आतुरतेने वाट पाहात होते. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होत नव्हते. अखेर 2 डिसेंबर रोजी मतदान होऊन 3 डिसेंबरला निकाल लागेल, याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. परंतु, न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे निवडणूक आयोगावर निवडणूक पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी आता 20 डिसेंबरला मतदान होईल. तर, अन्य नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत असून, बुधवारी मतमोजणी होणार होती. याला नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले होते. यावेळी रद्द झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना जुने चिन्ह देण्यात यावे तसेच खर्चाची मर्यादा वाढवून देण्यासह सर्व निकाल 21 डिसेंबरला जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने तीन डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती देत सर्व निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय दिलेला आहे.
न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकत्रित 21 डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरु आहेत. मंगळवारीच न्यायालयात त्यावर शिक्कमोर्तब केले. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने 24 संपूर्ण नगरपालिका तर 150 पेक्षा अधिक प्रभागांमधील निवडणूक स्थगित केली. या निवडणुकीत एक कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत आहे. याशिवाय नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकेसाठी मतदारांना तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अशी दोन मते द्यावी लागतील.







