। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचे पालन करूनच पाच राज्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
690 मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले 40, मणिपूरमधील 60, पंजाबमधील 170, उत्तराखंडमधील 70 आणि उत्तर प्रदेशमधील 403 निवडणुकांचा समावेश आहे. यासाठी एकूण 18.3 कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक 29 टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात 24 टक्के, मणिपूरमध्ये 19 टक्के, उत्तराखंड 18 टक्के तर पंजाबमध्ये 10 टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. 24.9 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये 11.4 लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1250 मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र 2 लाख 15 हजार 368 आहेत. 1620 मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचार्यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण 900 निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
1 ला टप्पा – 10 फेब्रुवारी
सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी 14 जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख 21 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी असेल. तर मतदान 10 फेब्रुवारीला होईल.
2 रा टप्पा
या टप्प्यात 4 राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. 21 जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख 28 जानेवारी, मागे घेण्याची मुदत 31 जानेवारी तर मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी असेल.
3 रा टप्पा
या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन 25 जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 1 फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत 4 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 20 फेब्रुवारी असेल.
4 टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख 27 जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख 3 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 7 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 23 फेब्रुवारी असेल.
5 टप्पा
यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन 1 फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 8 फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख 11 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 27 फेब्रुवारी असेल.
6 टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसर्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन 4 फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख 11 फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख 16 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 3 मार्च असेल.
7 टप्पा
उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन 10 फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 17 फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख 21 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 7 मार्च असेल.
मतदानाचा कालावधी 1 तासाने वाढला
मतदानाचा कालावधी सर्व पाच राज्यांमध्ये एका तासाने वाढवण्यात आला आहे. संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्य तेवढा प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो प्रत्यक्ष प्रचार टाळावा. यासंदर्भातली सविस्तर नियमावली नंतर जारी करण्यात येईल.
5 लोकांना डोअर टू डोअर प्रचार करण्याची परवानगी
15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, रॅलीला मनाई, कोणत्याही प्रकारे रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली वगैरेला 15 जानेवारीपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रकारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा गटांना रॅली काढायला 15 जानेवारीपर्यंत परवानगी नसेल. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत प्रचारावर बंदी असेल. सार्वजनिक रस्ते, चौकात कोणत्याही नुक्कड सभांना परवानगी दिली जाणार नाही. विजयानंतर रॅली काढता येणार नाही. तसेच, विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल. परिस्थितीचा अंदाज घेऊन रॅलीला परवानगी देण्यात आली, तर स्थानिक नियमावलीचं पालन करूनच त्या घेता येईल. लोकांना मास्क आणि सॅनिटायझर द्यावे लागतील. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच या सभा घेता येतील. उमेदवारासह जास्तीत जास्त 5 लोकांना डोअर टू डोअर प्रचार करता येईल. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घेतली जातील.