मुरुड तालुका कृउबा समितीसाठी आज मतदान

निकालाची सर्वाना उत्सुकता

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान संपन्न होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकाप चे वर्चस्व आहे. परंतु यंदा शिवसेना भाजप व काँग्रेस एकत्र येऊन हि निवडणूक लढवत आहेत. तर शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे मिळून ही निवडणूक लढवत आहेत. नेहमी एकमार्गाने होणारी ही निवडणूक आता मात्र मोठी रंगतदार झालेली आहे. आज मतदानाच्या वेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुरुड शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मध्ये मतदान ठेवण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 17 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यापैकी शेकापचे 2 सदस्य तर शिवसेना मित्र पक्षाचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता 13 सद्सय्यांसाठी मतदान संपन्न होत आहे.

मुरुड तालुक्यात 24 ग्रापंचायत असून 230 ग्रामपंचायत सदस्य मतदान करणार आहेत. तर सहकारी पतसंस्थाचे 63 मतदाते 13 जागा निवडून येण्यासाठी मतदान करणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता असणाऱ्या शेकापला शिवसेनेने कडवे आवाहन उभे केले असून 2 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा प्रवेश कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाला आहे. 13 जागांपैकी सर्वात जास्त सदस्य कोणाचे निवडून येतात हे आता थोड्याच अवधीत पहावयास मिळणार आहे. शिवसेनेने सुद्धा ही निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत घेत मोठी आखणी केल्याचे दिसून येत आहे. मतदाते कमी असताना सुद्धा सार्वत्रिक निवडुकांची तयारी सारखीच ही निवडणूक लढवली जात असल्याने प्रत्येक मतास खूप महत्व प्राप्त झाले आहे. एरवी ग्रामपंचायत सदस्याला कोणी महत्व देत नसत, परंतु आज त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त असल्याने प्रत्येक पक्ष त्यांना मनधरणी करताना दिसत आहे. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान संपन्न होणार असून, त्वरित सायंकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती पतसंस्थांचे ए.आर.श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version