उद्या होणार मतदान

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच 168 वएक हजार 246 सदस्यपदाच्या जागांसाठी रविवारी (दि.5) रोजी 652 केंद्रावर मतदान होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर शनिवारी सकाळपासून तहसील कार्यालयातून मतदान यंत्र केंद्रावर नेण्याची तयारी करण्यात आली. मतदान प्रकिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केंद्रावर ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सोमवार ( दि.6 नोव्हेंबर ) रोजी मतमोजणी होणार आहे.

अलिबाग 152, मुरुड 110, पेण पनवेल 75, 161, उरण 39, कर्जत 63, खालापूर 153, रोहा 98, सुधागड 88, माणगाव 98, तळा 9, महाड 70, पोलादपूर 91, श्रीवर्धन 20 आणि म्हसळा 19 अशा एकूण एक हजार 246 सदस्यपदांसाठी तसेच अलिबाग 15, मुरुड 13, पेण 9, पनवेल 17, उरण 3, कर्जत 7, खालापूर 22, रोहा 12, सुधागड 10, माणगाव 21, तळा 4, महाड 12, पोलादपूर 16, श्रीवर्धन 4आणि म्हसळा 3 अशा एकूण 168 थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.

आता वेगवेगळ्या राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मतदानाकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील पाचशे केंद्रावर मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तीन हजार 912 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त असणार आहे.

तीन लाख 81 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
ग्रामपंचायत निवडणुकीत तीन लाख 81 हजार 423 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख 88 हजार 823 महिला व एक लाख 92 हजार 599 पुरुष मतदारांचा समावेश आहे. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, व अन्य ठिकाणी असलेले मतदारही जिल्ह्यातील गावांमध्ये मतदानासाठी दाखल झाले आहेत. काहीजण रविवारी सकाळी मतदानासाठी येणार आहेत. 
मतदार मकर्मचारी केंद्रांवर रवाना
ईव्हीएम मशीन व अन्य मतदान यंत्रणा घेऊन कर्मचारी सकाळी दहा वाजल्यापासून केंद्रावर रवाना झाले आहेत. मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी एसटी महामंडळ विभागाच्या सुमारे 26 एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अलिबाग आगारातून सात, मुरुड आगारातून चार, पेण आगारातून चार, माणगाव आगारातून तीन, कर्जत आगारातून तीन व रोहा आगारातून पाच बसेस दिल्या आहेत.
602 बिनविरोध; 38 सरपंच, 564 सदस्यांचा समावेश
थेट सरपंच पदांच्या 210 जागांपैकी महाड, पोलादपूर येथे प्रत्येकी एक व श्रीवर्धन येथे दोन अशा चार ठिकाणी एकही वैध अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज माघारीनंतर मुरुड,पेण, तळा, श्रीवर्धन येथे प्रत्येकी दोन, सुधागड येथे तीन, पोलादपूर, माणगावात प्रत्येकी पाच, महाडमध्ये आठ तर म्हसळा तालुक्यात नऊ अशी एकूण 38 सरपंचपदे बिनविरोध झाली आहेत. माणगाव, तळा, मुरुड, पनवेल, महाड, पोलादपूर श्रीवर्धन, म्हसळा येथील 44 जागांवर एकही अर्ज दाखल झाला नाही. अलिबाग 5, मुरुड 24, पेण 36, पनवेल 13, उरण 2, कर्जत 4, खालापूर 49, रोहा 16, सुधागड 23, माणगाव 120, तळा 38, महाड 74, पोलादपूर 68, श्रीवर्धन 29 आणि म्हसळा 63 असे एकूण 564 सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Exit mobile version