नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या विविध वास्तुंमधील वडाळा तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. वडाळा तलावातील पाण्याची गुणवत्ता जलपर्णी तसेच इतर पान वनस्पतीमुळे कमी होऊ लागली होती. जलपर्णी वाढल्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यानेे तलावातील पाणी दूषित होऊन गुणवत्ता कमी होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनूसार वडाळा तलावातील पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी बायो रिमेडिएशन अँड मेकॅनिकल पद्धतीने प्रक्रिया करून प्रदूषित झालेल्या पाण्याचा दर्जा सुधारण्यात येणार आहे.
तलावामध्ये वाढलेली अनावश्यक जलपर्णी मशीन तसेच कामगारांच्या साहाय्याने काढली जात आहे. वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी 29 जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी मंजुरी दिली होती. त्यानूसार या कामास सुरूवात करण्यात आली आहे.