पगार थकले, कर्मचार्‍यांची उपासमार

एसटी कर्मचारी पगाराविना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रात्रीचा दिवस करून प्रवाशांना सेवा देणारे एसटी महामंडळाचे कर्मचारी पगाराविना असल्याची माहिती समोर आली आहे. दर महिन्याच्या सात तारखेला होणारे वेतन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे त्यांना महिन्याचा घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. एसटी महामंडळ रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, माणगाव, मुरूड व रोहा असे आठ आगार असून, 19 बसस्थानके आहेत. विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे.

जिल्ह्यामध्ये 480 एसटी बसेस असून, दोन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. त्यात सुमारे दीड हजार चालक व वाहकांचा समावेश आहे. एसटी महामंडळाला जिल्ह्यातून एका दिवसामध्ये सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. इंधन बचत करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मानदेखील केला जातो. ईव्हीएम मशीन व कर्मचार्‍यांची मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याचे कामदेखील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केले. एसटीतून त्यांना सुखरुप निश्‍चित स्थळी सोडण्याची भूमिका प्रामाणिकपणे बजावली. मात्र, हेच एसटी कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना मिळणारे वेतन लांबणीवर गेले आहे. वेतन लांबणीवर गेल्याने महिन्यातील घरखर्च चालविताना कर्मचार्‍यांसमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. दर महिन्याला बँकेतील हप्ता, घरातील सामन खरेदी अशा अनेक बाबींचा ताळमेळ बसविताना समस्या निर्माण झाली आहे.

निधीअभावी वेतन लांबणीवर
निधीअभावी कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर गेले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पगार होण्याची शक्यता आहे. निधी शासनाकडून पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कदाचित सोमवारपर्यंत पगार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून नाव न सांगण्याच्या अटीवरून देण्यात आली आहे.
Exit mobile version