। नेरळ । प्रतिनिधी ।
खांडस, ता.कर्जत येथे वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघा जणांना वनविभागाने सापळा रचून अटक केली. कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना काही शिकारी लोक जंगलात गेल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने राऊंड स्टाफ मौजे-खांडस गावाच्या पुढे जंगलाच्या दिशेने गस्त करीत असताना त्यांना पांढर्या रंगाची ईको गाडी संशयित वाटल्याने या गाडीचा 3 ते 4 मीटर पाठलाग करून थांबविली. या गाडीत वागूर नग-4, वागूर उभे करण्यासाठी 28 बांबूच्या काठ्या व दोन ठासनीच्या बंदुका मिळाल्या. चालक देवानंद विठ्ठल खांडवी, रा.वडाचीवाडी नांदगाव, ता.कर्जत, यांच्यासह आरोपी रविंद्र रावजी वारगुडे व विशाल धोंडू बांगारे दोघेही रा.पेठारवाडी, ता.कर्जत असे एकूण तीन आरोपींना गाडी व मुद्देमालासह ताब्यात घेतले. कर्जत (पूर्व) वनपरिक्षेत्र अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
वनपाल खांडस (अतिरिक्त कार्यभार) काळुराम दगडू लांघी, खांडस वनरक्षक प्रकाश वैजनाथ मुंढे, चाफेवाडी वनरक्षक माधव शंकर केंद्रे व जामंरुग वनरक्षक विठ्ठल बळीराम खांदाजे हे या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईकरिता अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
रानडुकराची शिकार
दुसर्या एका घटनेत रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणार्यांवर वनविभागान कारवाइ केली आहे. कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना गुप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र कर्जत पूर्व परिमंडळ हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी श्री.मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकर्यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी दशरथ बाळू वाघमारे, शरद रघुनाथ वाघमारे, सोमनाथ पप्पू पवार, साळोखवाडी, दिपक लहानू पवार (सर्व आरोपी राहणार मौजे साळोखवाडी) यांनी रानडुकराची शिकार करून त्याच्या अवयवाचे व मांसाच्या विक्रीसाठी कोयत्याने तुकडे करीत असताना आढळून आले. त्यांनी वनकर्मचार्यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र वनकर्मचार्यांनी या गुन्ह्यातील आरोपी दशरथ बाळू वाघमारे यांना ताब्यात घेतले. या आरोपीने सांगितलेल्या जबानीवरुन रविंद्र मुका वाघमारे, यास अटक करण्यात आले. तसेच वनकर्मचार्यांनी संबंधित ठिकाणावरुन रानडुकराचे 39.120 किलोग्राम मांस व अवयव हस्तगत केले तसेच 4 कोयते, तराजू काटा हे साहित्य जप्त केले.