। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एसटी महामंडळाकडून कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. या कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान आणि दिवाळी बोनसची प्रतीक्षा लागून राहिली आहे. महामंडळाच्या संथ कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो एसटी कर्मचार्यांची दिवाळी सानुग्रह अनुदानाविना जाण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, मुरूड, महाड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा असे आठ एसटी बस आगार असून, 19 बसटी बसस्थानके आहेत. जिल्ह्यामध्ये 380 हून अधिक एसटी बस गाड्या आहेत. दिवसाला एक लाखाहून अधिक प्रवास एसटी करते. एसटीतून दिवसाला सुमारे 40 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. तीन हजारांहून अधिक एसटी कर्मचारी एसटीमध्ये काम करीत आहेत. त्यात सुमारे दीड हजारांहून अधिक चालक व वाहकांचा समावेश आहे. दरवर्षी कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी बोनस सहा हजार रुपये व सानुग्रह अनुदान साडेबारा हजार रुपये दिला जातो. या सणामध्ये फराळ व इतर साहित्य खरेदीसाठी प्रचंड खर्च होतो. त्यामुळे दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान दिवाळीत आर्थिक ताळमेळ ठेवण्यास उपयोगी ठरतो.
मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, गुरुवारी 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, शनिवारी दोन नोव्हेंबर रोजी दीपावली पाडवा तथा बलिप्रतिपदा आणि तीन नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान व बोनस देण्याबाबत कोणतीही हालचाल एसटी महामंडळाकडून झाली नाही. सानुग्रह अनुदानासाठी अनेकांनी कार्यालयात प्रस्ताव पाठविला आहे. तरीदेखील त्याबाबतही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची खंत एसटी कर्मचार्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.