रेवस जेट्टी रखडल्याने रो-रोची प्रतीक्षा

| चिरनेर | वार्ताहर |

उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरणमधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरांदरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या मार्गाला जोडणार्‍या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम रखडल्याने ही सेवा सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.

उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान चार किलोमीटरचे सागरी अंतर असून, अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार 25 कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो-रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. दरम्यान, रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

Exit mobile version