शिघ्रे ग्रामपंचायत डंपिंग ग्राऊंडच्या प्रतिक्षेत

प्रशासनाने तातडीने जागा द्यावी, घंटागाडी आठ महिन्यांपासून बंद ,वेशीवर कचर्‍याचे साम्राज्य
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीमध्ये कचरा गोळा करणारी घंटा गाडी आठ महिन्यांपासुन बंद करण्यात आल्याने वेशीवरील गटारात कचरा मोठया प्रमाणावर ग्रामस्थ टाकत असल्याने वेशीवर कचर्‍याचे ढिग आरोग्यासाठी घातक ठरू पहात आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कचर्‍याची विल्हेवाट लावल्यास ग्रामस्थांच्य आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.तरी प्रशासनाने तातडीने डंपिंग ग्राऊंडची जागा ग्रामपंचायतीला तातडीने निश्तचत करावी आणि कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.या संदर्भात शिघ्रे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष पाटील म्हणाले की, 14 व्या वित्त आयोग निधीतून आम्ही घंटागाडी डिसेंबर 2020 मध्ये खरेदी केली.पूर्वी शिघ्रे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट केली जात असे.परंतु सदरची जागा मुख्य रस्त्यालगत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होऊ लागल्याने घंटा गाडी बंद करण्यात आली. तथापि ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 157 व 154 मध्ये कचर्‍याची विल्हेवाट केली जात आहे परंतु सदरची जागा मुख्य रस्त्यालगत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 37,33 व 43 ही जागा सरकारी मालकीची असुन सदर जागा डंपिंग ग्राऊंड करीता उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी अलिबाग तसेच मुरूड गटविकास अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच पाटील यांनी दिली.
सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्वच्छता अत्यंत महत्वाची असुन शिघ्रे ग्रामपंचायत अंतर्गत शिघ्रे, वाणदे, नागशेत, नवीवाडी व आदिवासीवाडी या भागातील 3500 लोकवस्तीतुन दररोज सुमारे टन भर कचरा गोळा केला जात असे. मात्र घंटागाडी बंद असल्याने कचर्‍याची मोठी गंभीर समस्या ग्रामस्थांना भेडसावते आहे.घंटागाडी सुरू होण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची जागा निश्‍चित होणे अत्यंत महत्वाचे आहे.अन्यथा कचर्‍याचे साम्राज्य नाहीसे होणार नाही. मुख्य रस्त्यावरच राजरोस कचरा ग्रामस्थांकडुनटाकला जात असुन येणार्‍या-जाणार्‍यांना या घाणीचा त्रास सोसावा लागत आहे.
शिघ्रे पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असुन याच रस्त्याच्या दुतर्फा निवासी घरे व दुकाने ही आहेत.त्यांना ही या घाणीचा त्रास आहे.शिवाय मुरुड-केळघर या खुष्कीच्या मार्गाने पुणे,मुंबई येथील पर्यटकांची मोठया संख्येने वर्दळ असते.घंटा गाडी सुरु केल्याशिवाय मुख्य रस्त्यावर बिनदिक्कत कचरा टाकणे थांबणार नाही ही वस्तुस्थिती आहे.तरी तहसिलदार कार्यालया मार्फत तातडीने उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेश अंमलात आणुन तहसिल व वन विभाग यांनी सामंजस्याने ग्रामपंचायतीला सहकार्य करावे आणि तातडीने नागशेत हद्दीत संयुक्त रित्या स्थळ पहाणी करुन डंपिंग ग्राऊंडसाठी शिघ्रे ग्रामपंचायतीला जागा निश्‍चित करून हस्तांतरीत करावी अशी विनंती शिघ्रे ग्रामस्थांनी केली आहे .

Exit mobile version