वाहतूक पोलिसांकडून विशेष स्टिकर्सची सोय
। पंढरपूर । वृत्तसंस्था ।
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची 14 जून रोजी बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेनुसार, 3 जुलै ते 21 जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना पथकरातून सूट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच परिवहन विभागासदेखील ज्यादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांना ‘आषाढी एकादशी 2024’, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलिस आणि संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करुन द्यावेत. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील या प्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गृह विभागाबाबत अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडे या अनुषंगाने कूपन अथवा पास प्राप्त उपलब्ध करुन द्यावेत. राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, चौकी येथून भाविकांना पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.