। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात पैसे वाटपाचा प्रकार मोदी-शाह यांच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विधानसभेतील पराभवाचे खापर फोडण्यासाठी भाजपच्याच मोठ्या नेत्याने विनोद तावडेंबाबत माहिती दिल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राज्यभर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून वारेमाप पैसा वापरला जात आहे. कराड दक्षिणेत दोन दिवसापूर्वी पैसै वाटताना एकाला पकडले आहे. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मोदी-शाह यांच्या आशीर्वादने हा प्रकार सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीनंतर भाजपाचा पराभव झाल्यास विनोद तावडेंवर पराभवाचे खापर फोडले जाईल आणि चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न चालला असून भाजपाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप
विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणावरुन विरोधकांकडून विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
मनोज जरांगेनी मला शुभेच्छा दिल्या असून मला श्रेयवादात, राजकारणात पडायचे नाही. दुपारी 3.30 वाजता मनोज जरांगे यांचा फोन आला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून ते तिसर्यांना निवडणूक लढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे अतुल भोसले हे निवडणूक लढवत आहेत. अत्यंत चुरशीची ही लढत होण्याची शक्ययता आहे.