खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो. रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार कल्पेश ठाकूर उपस्थित होते.
