फटाके घ्यायचेत? मग तुमची देखील होऊ शकते फसवणूक…

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
दिवाळी म्हटले कि फटाक्यांची आतषबाजी येते. लहान मुलांना फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंततर यावर्षी कोरोना नियमात शिथिलता आल्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फटाके विक्रेत्यांनी दुकाने उभारली आहेत. तसेच मागच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे फटाक्यांची विक्री अल्प प्रमाणात झाली. गेल्यावर्षीचा फटका भरुन काढण्यासाठी काही विके्रत्यांनी यावर्षी जुने फटाके विक्रीस ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांनी फटाके खरेदी करताना शहनिशा करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा फटाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
शासनाच्या नियमानूसार जुने फटाके विकण्यास बंदी आहे. मात्र असे असतानाही काही विक्रेते शासनाचे नियम जुगारुन जुने फटाके विकत आहेत. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोहिम हाती घेतली. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.3) रोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोहा नगरपालिकेसमोर असलेला फटाके विक्रेता जुने फटाके विकत असल्याचे समोर आले. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीकडून 23 हजार 270 रुपयांचा माल जप्त केला असून दुकान मालकास समज देत सोडविले. चंद्रकांत घोसाळकर असे आरोपीचे नाव असून पुढिल तपास पीएसआय ढागरे करीत आहेत.
तर नागोठणे येथे रात्री 8 वाजल्याच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीरपणे फटाका स्टॉल लावला व सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री केल्या प्रकरणी नागोठण पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपीच्या स्टॉलमधून 7 हजार 352 किमतीचा माल हस्तगत केला. याबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथ गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version