मुंबई, पुण्याला जायचंय? वाहतूकित होणार ‘हे’ महत्वाचे बदल!

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी सिडको घेराव; आंदोलनापूर्वी खबरदारी
। पनवेल । साहिल रेळेकर ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी संघर्षाची ठिणगी चांगलीच पेटली आहे. विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती ठाम आहे. या पार्श्‍वभूमीवर 24 जूनला सिडकोला घेराव घालण्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तयारी संदर्भात हे आंदोलन किमान 1 लाख लोकांच्या सहभागात मभूतो न भविष्यतोफ असे असणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
यादरम्यान नवी मुंबईत येणार्‍या-जाणार्‍या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. पोलिसांनी हे रस्ते अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार 24 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे- बेलापूर रस्त्यावरील हलकी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे, शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

विनाकारण प्रवास पडेल महागात
अत्यावश्यक सेवा, चाकरमानी, नोकरदारवर्ग यांना प्रवासासाठी मुभा दिली जाणार आहे. मात्र त्यांच्या रहिवासाचे ओळखपत्र व नोकरीचे ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढे प्रवासाला जाण्याची मुभा दिली जाणार नाही. विनाकारण प्रवास करणार्‍यांना देखील यादरम्यान प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एनएमएमटी बसेस, टीएमटी बसेस, सिटी बसेस यादरम्यान शक्यतो बंद राहणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

वाहतूकीत झालेले बदल
1) पुण्याहून एक्स्प्रेसवे मार्गे मुंबईच्या दिशेने येणारी वाहने कळंबोली येथून रोडपली- तळोजा- नावडे- शिळफाटा- महापे- पाम बीच- वाशी- वाशी टोल नाका मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक वळवली जाणार आहे.

2) मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने मुंबईहुन- वाशी- वाशी गाव- पाम बीच- महापे- शीळफाटा- नावडे- कळंबोली सर्कल वरून एक्स्प्रेस वे मार्गे पुण्याच्या दिशेने वाहतूक वळवली जाणार आहे.

3) कळंबोली, रोडपलीहुन उरण फाटा येथे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नवी मुंबईत अंतर्गत प्रवास करणार्‍या वाहनांसाठी तसेच रायगडच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी वाशीहून- उरण फाटा- किल्ला जंक्शन- गव्हाण फाटा- पळस्पे फाटा मार्गे गोवा हायवे व खोपोलीच्या दिशेने वाहतूक वळवली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाला नवी मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. आंदोलन स्थगित करण्याबाबत नवी मुंबई पोलिसांच्या मार्फत आंदोलकांना पत्रही देण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कोणतेही विपरीत परिणाम घडू नयेत तसेच सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही असे पोलिसांच्या वतीने आंदोलकांना आवाहन करण्यात येत आहे

शिवराज पाटील (पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2)

Exit mobile version