45 हजार कंटेनर्सची कोंडी; निर्यातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
| उरण | प्रतिनिधी |
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक व्यापार मार्गांवर मोठा परिणाम झाला असून, भारतीय निर्यातदारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या सुमारे 40 ते 45 हजार भारतीय कंटेनर्स अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. काही कंटेनर्स समुद्रप्रवासातच थांबले आहेत, तर काही विविध आंतरराष्ट्रीय बंदरांमध्ये अडकलेले आहेत. या कंटेनर्समध्ये असलेल्या एक ते दीड अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाचे भवितव्य सध्या अधांतरी झाले आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय जहाज मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय माल घेऊन परदेशात जाण्याआधीच भारतातील विविध बंदरांमध्ये सुमारे 20 हजार जहाजे रखडली आहेत. या जहाजांवरील कंटेनर्सना कधी मार्ग मोकळा होणार याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, या अडकलेल्या कंटेनर्ससमोर सध्या दोनच पर्याय उरले आहेत. एक म्हणजे, युद्धग्रस्त मार्ग टाळण्यासाठी मोठा आणि खर्चिक वळसा घेऊन निश्चित ठिकाणी पोहोचणे, किंवा सरळ युटर्न घेऊन पुन्हा भारतात परतणे. दोन्ही पर्याय निर्यातदारांसाठी मोठ्या आर्थिक फटक्याचे ठरत आहेत. यात भर म्हणजे, शिपिंग कंपन्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत विविध आपत्कालीन अधिभार आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एका कंटेनरच्या निर्यातीसाठी येणाऱ्या खर्चात तीन ते पाच पट वाढ झाल्याची माहिती आयात-निर्यात क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे.
ट्रायटॉन लॉजिस्टिक्स अँड मेरिटाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतीय माल घेऊन परदेशात निघालेल्या 40-45 हजार कंटेनर्सपैकी सुमारे 80 टक्के कंटेनर्स अजूनही समुद्रप्रवासातच अडकलेले आहेत. काही कंटेनर्स हवाई मार्गानेही पाठवण्यात आले होते, मात्र तेही विविध ठिकाणी अडकले. यातील अनेक कंटेनर्समध्ये नाशवंत माल असल्यामुळे तो आधीच खराब झाला आहे. त्याचबरोबर शिपिंग कंपन्यांकडून युद्धधोका अधिभार, खर्च वसुली अधिभार आणि पीक सिझन शुल्क आकारले जात असल्याने माल वाहतुकीतून मिळणारा उरलेला नफाही संपुष्टात आला आहे. सध्या प्रत्येक कंटेनरवर युद्धस्थितीमुळे तीन हजार ते पाच हजार डॉलर्सपर्यंत अतिरिक्त अधिभार आकारला जात आहे. परिणामी, मध्यपूर्वेतील युद्धाचा सर्वाधिक फटका भारतीय निर्यातदार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला बसताना दिसत आहे.







