वारंगी ग्रामस्थांचे वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण


| महाड | वार्ताहर |

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्याच दिवशी महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषण प्रारंभ करून शासनाला घरचा आहेर दिला आहे. तालुक्यात अनेक गावात गांजलेले पोल आणि वीज मीटर बदलण्याची मागणी होत असताना देखील पोल बदलले जात नसल्याने ग्रामीण भागात नाराजी व्यक्त होत आहे. माणूस मरायची वाट महावितरण बघतेय का असा प्रश्न देखील ग्रामस्थ करत आहेत.

तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला ग्रामीण भागातील जनता अक्षरशः वैतागली आहे. वाढीव वीज बिल व वीज वितरणातील अनागोंदी कारभारावर देखील नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या गंजलेल्या विद्युत खांबामुळे जनतेच्या जीवाला होणारा धोका पाहता वारंवार पोल बदलण्याची मागणी करून देखील वीज वितरण कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने वारंगी येथील ग्रामस्थांनी काळ नदी बचाव समितीकडून वीज वितरण कंपनीच्या महाड येथील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. काळ बचाव समितीचे राघू तांबटकर, निलेश जाधव आणि अन्य कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

वारंवार मागणी करून देखील वारंगी आणि परिसरातील गंजलेले विद्युत पोल बदलण्याची मागणी केली जात आहे मात्र याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. या तालुक्याला महावितरणच्या बाबतीती कोणी वालीच नाही.

-निलेश जाधव
उपोषणकर्ता

Exit mobile version