जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव ठरणार महत्त्वाचे खेळाडू
। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकमध्ये रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक संघ एकमेकांविरोधात भिडणार आहेत. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अनेक चाहते आतुरतेने या सामन्याची वाट पाहत आहेत.
भारताने न्युयॉर्कमध्ये पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला आहे. ज्यात भारताने विजय मिळवला होता. पण पाकिस्तानला न्युयॉर्कमध्ये खेळण्याचा अनुभव नाही, त्यांनी डेलासमध्ये अमेरिकेविरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळला आहे. त्यांना त्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, याचाच फायदा भारताला होऊ शकतो, असे माजी कर्णधार हरभजन सिंगने म्हटले आहे.
याबरोबरच हरभजनने भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकणार्या दोन खेळाडूंबद्दलही सांगितले असून प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल व्हायला हवा हे सांगितले आहे. एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, या मैदानात भारत आधी खेळला असल्याने त्याचा फायदा भारताला होईल, पण पाकिस्तान पाटा खेळपट्टीवर खेळल्यानंतर भारताविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानसाठी हे आव्हान असेल. त्यांना अमेरिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर या परिस्थितीत स्थिरावणे अवघड असणार आहे. भारतीय संघ चांगला खेळत असल्याने त्याचा फायदा होईल.
याशिवाय हरभजन म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात. हे दोन्ही खेळाडू मॅच विनर्स आहेत. त्याबरोबर हरभजनने एक बदल सुचवताना म्हटले की, कुलदीप यादव विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे गोलंदाजीतील विविधताही आहे. त्यामुळे तो खेळायला पाहिजे. मला वाटते जेव्हापासून भारताला 8 व्या क्रमांकावर फलंदाजाची गरज भासली, तेव्हापासून अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले. भारताने आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. भारताने फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या दोघांना खेळवले होते.