| चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या 450 कामगारांच्या निवृत्तीनंतर त्याजागी यापुढे एकही कामगाराची भरती करण्यात येणार नाही, असा आदेशच ओएनजीसी प्रशासनाने काढला आहे. कामगारांच्या हिता विरोधात काढण्यात आलेल्या आदेशामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी ओएनजीसी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हा आदेश मागे घेण्यात यावा आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 29 जुलै रोजी काळ्या फिती लावून आस्थापनाचा जाहीर निषेध करणार असल्याचा इशारा मंगळवारी (दि.23) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात विविध प्रकारच्या कंत्राटी कामात स्थानिक सुमारे 450 कामगार काम करीत आहेत. ठेकेदार बदलला तरी तेच कामगार काम करत असतात. मात्र, त्यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे वेतन, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. दोन-तीन वर्षात ठेकेदार बदलतात. मात्र, अनेक ठेकेदार कामगारांचे पीएफ, वीमा, देणी मुदतीत न देताच पलायन करतात. ठेकेदार, काही कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि ओएनजीसी प्रशासन अधिकारी यांच्यातील आपापसातील संगनमतांमुळे याआधीच न्याय मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ओएनजीसी प्रशासन आणि कंत्राटी कामगार यांच्यातच संघर्षाची ठिणगी पडली आहे. या ठिणगींचे रुपांतर आंदोलनात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचीच माहिती देण्यासाठी ओएनजीसी स्थानीय प्रकल्पग्रस्त कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि नागाव, केगाव, चाणजे आदी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी उरण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
उरण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष अनंत घरत, प्रवीण पुरो, सरपंच चेतन गायकवाड, सरपंच जगजीवन नाईक, सरपंच अजय म्हात्रे आणि ओएनजीसीचे कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.