उरण रेल्वे उद्घाटन प्रसंगी आंदोलनाचा इशारा

स्थानकांना गावाचीच नावे देण्याची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

उरण रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी या प्रकल्पासाठी जमिनी देणार्‍या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. रेल्वे स्टेशनला ज्या गावांची (मौजे) जमीन घेण्यात आली आहे. त्या मौजे असलेल्या बोकडविरा, नवघर धुतूम, कोट या गावांनी आमच्या गावांचीच नावे त्या त्या स्टेशनना द्यावीत, अशी आग्रही मागणी केली आहे.

सिडको कार्यालयात याबाबत बैठकाही झाल्या, चर्चाही करण्यात आली. परंतु अद्याप मौजे गावांची नावे न दिल्याने बोकडविरा सरपंच अपर्णा पाटील, स्मिता पाटील, भगवान पाटील, भगवान पाटील खंडेश्‍वर, नवघर सरपंच सविता मढवी, रायगड भूषण प्रा.एल.बी, अध्यक्ष समाधान तांडेल, उपसरपंच दिनेश बंडा, विश्‍वास तांडेल, अमित जोशी, नितीन मढवी, रत्नाकर चोगले, धूतूमचे प्रेम ठाकूर, शैलेश ठाकूर इत्यादी 23 प्रमुख कार्यकर्ते यांनी वाशी सिडको कार्यालयात नावासंबंधी जाहीर भूमिका स्पष्ट न केल्यास उद्घाटनाच्या दिवशी चारही गावचे ग्रामस्थ सिडको आणि रेल्वे विरोधात उग्र भूमिका घेणार असल्याचे ग्रामपंचायतींनी कळविले आहे. तसेच रेल्वे स्टेशनवर आक्रमकपणे निदर्शने करणार असे जाहीर केले आहे.

येत्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेचे उद्घाटन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र चार गावांचा नावांसंबंधी होणारा हल्लाबोल उरण तालुक्यातील वातावरण ढवळून काढणार असे चित्र जाणवू लागले आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना भूषण पाटील म्हणाले की, उरण येथील रेल्वे स्टेशन बाबत होणारी टाळाटाळ दुःखदायक आहे. प्रा.एल.बी म्हणाले सिडको आणि रेल्वेला याबाबत जनताच योग्य उत्तर देईल. आता ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर सिडको काय निर्णय घेते, याकडे उरणकरांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Exit mobile version