रखडलेल्या विकासकामांना सुरुवात न झाल्यास ठिय्या आंदोलन

चिपळूणकरांचा इशारा
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण नगरपरिषदेच्या प्रभारक्षेत्राती विकासकामे अद्यापही रखडलेली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत शहरातील वैश्यवासाहत येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शेट्ये यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदन दिले असून, येत्या आठ दिवसात ही कामे सुरुवात न झाल्यास नागरिकांसह नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चिपळूण नगरपरिषदेच्या जवळच असलेल्या शिवनदी पूल, एकवीरा मंदीर, वडनाका, बापटआळी, जुना कालभैरव मंदीर, लोकमान्य टिळक वाचनालय, वेस मारुती मंदीर या रस्त्याचे भूमिपूजन समारंभ करून दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस होवूनही प्रत्यक्ष कामाला कोणत्याही प्रकारची सुरवात झालेली नाही.
वडनाका सोनारआळी ते जनता (गोखले) हॉस्पिटल, शेट्ये नाका या भागांतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत करून स्थगित ठेवले आहे. वैश्यवसाहत मुरलीधर मंदीर ते राऊतआळी गणपती मंदीर या शहरातील महत्त्वाच्या भागामध्ये गेली दोन ते तीन वर्षे कामाची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील होत असल्याचे दिसून येत आहे.

नगरपालिकेने अनामत रक्कम रखडविल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत
रखडलेल्या कामांबाबत संबंधित ठेकेदारांकडे विचारले असता मागील पूर्ण झालेल्या कामांची अनामत रक्कम देण्यास नगरपालिकेच्या संबंधित प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. अशी अनामत रक्कम काही लाखांच्या घरात जात असून, यामुळे ठेकेदारांचे पैसे नगरपालिकेत अडकून पडले आहेत.यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठेकेदारांना काम सुरू करणे अशक्य होऊन बसले आहे.सदरची कामे रखडल्याने पर्यायाने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. तरी प्रशासनाने ठेकेदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version