अरे बापरे! पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातही पावसासाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या काही भागात तरुळक पावसाचे थेंब पडल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांच कंबरडं मोडलं आहे. त्यातूनही सावरत शेतकर्‍यांनी गहू, हरभरा, ज्वारी, कांदे आदीसह भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर टाकली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण असून, काही भागात सूर्यदर्शन सुद्धा झाले नाही. तर पैठण रोडवरील गेवराई परिसरात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तुरळक पावसाचे थेंब पडले आहेत. तर परभणी जिल्ह्यात काल रात्री अर्धा तास पाऊस झाला असून, सकाळपासून गारवा जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधून मधून रिमझिम अगदी हलक्या स्वरूपाचा पाउस येतोय. तसेच उस्मानाबाद,जालना आणि लातूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Exit mobile version