Wasteful Use of Electricity: पेण पंचायत समितीत विजेची उधळपट्टी

| पेण | प्रतिनिधी |

देशाचे पंतप्रधान पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि सार्वजनिक संपत्तीचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करत असताना सरकारी कार्यालयांमध्ये मात्र या संदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. पेण पंचायत समितीच्या बैठकीच्या हॉलमध्ये कुणीही उपस्थित नसताना तब्बल आठ पंखे आणि चार लाईट बराच वेळ चालू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. विशेष म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असतानाही हे पंखे आणि लाईट बंद करण्याची साधी तसदी कुणी घेतली नाही. ही बाब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देत संबंधित हॉलमधील लाईट व पंखे बंद करण्यास सांगितले. मात्र, ही जबाबदारी एखाद्या नागरिकाने लक्षात आणून द्यायची का? कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नेमके काय पाहत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, अनेक खोल्यांमध्ये फक्त एक-दोन कर्मचारी बसलेले असतानाही चार-चार पंखे सुरू असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे वीज वाचवा हे फक्त भाषणापुरतेच राहिले आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

Exit mobile version