वन विभागाचा पुढाकार
। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई–गोवा महामार्गालगत असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वन विभागाने पक्षी व वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मार्च महिन्यात तापमान वाढत असल्याने जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागतात. त्यामुळे पक्षी आणि लहान वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. टँकरच्या मदतीने या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे पक्षी व प्राण्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
कर्नाळा अभयारण्यात वर्षभर विविध दुर्मीळ आणि स्थलांतरित पक्षी आढळतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाकडून दरवर्षी अशी व्यवस्था केली जाते. तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमुळे जंगलातील जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाच्या या उपक्रमामुळे कर्नाळा परिसरातील पक्षी व वन्यजीवांना उन्हाळ्यात आवश्यक असलेले पाणी सहज उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.










