| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी परिसरातील आपटा येथील कोरळ आदिवासी वाडीत गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टाटा वोल्टास इंडियाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या सेवा सप्ताहानिमित्त (व्हॉलंटिअरी वीक) शुक्रवारी 45 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून कोरळ आदिवासी वाडीत वनराई बंधारा बांधला. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यातील पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वोल्टास इंडियाच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत (सीएसआर) गेल्या दोन वर्षांपासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोरळ आदिवासी वाडीत जलसंवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात वनराई बंधारे, तर उन्हाळ्यात गॅबियन बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम केले जाते. या प्रयत्नांमुळे पाण्याचा साठा वाढविण्यासोबतच भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आदिवासी वाडीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विहिरीची दुरुस्ती, अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती आणि त्यांच्याभोवती पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती अशी कामेही करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे पाणी उपलब्धतेत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रम
