पाण्यासाठी करावी लागणार नागरिकांना वणवण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यावरील पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. चिंता वाढविणारी बाब म्हणजे, पाणीपुरवठा करणार्या नऊ लघुपाटबंधारे व 36 तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीसंकट गहिरे होत चालले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तलाव कोरडे पडत चालले आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर येणार आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येणार्या लघुपाटबंधार्याच्या तलाव व पाझर तलावांमध्ये सुमारे 25 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील 22 गावे व 52 वाड्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, 18 खासगी टँकरने त्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात यंदा पाऊस समाधानकारक पडला. अनेक विहिरी, नदी, तलाव, पाझर तलाव पाण्याने भरून गेले. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांना होती. परंतु, नागरिकांची निराशा झाली आहे. रायगड जिल्हा परिषद विभागाकडील लघुपाट बंधारे योजनेची नऊ तलाव आहेत. या तलावांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. यात तलावांमध्ये फक्त 29 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात सर्वात कमी जलसाठा मुरुड तालुक्यातील विहूर लघुपाट बंधारे तलाव, अलिबाग तालुक्यातील कामार्ले लघुपाटबंधारे तलाव, कर्जत तालुक्यातील बलिवरे लघुपाटबंधारे तलावांमध्ये 105 ते 177 दशलक्ष घनमीटर इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. या तलावांमध्ये 20 टक्केच जलसाठा असल्याची माहिती आकडेवारीनुसार समोर येत आहे.
जिल्ह्यातील 36 ठिकाणी जिल्हा परिषद विभागामार्फत तलावाची योजना राबविली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात तीन, पनवेलमध्ये दोन, पेणमध्ये एक व कर्जतमध्ये पाच, खालापूरमध्ये आठ, रोहामध्ये सहा, सुधागडमध्ये दोन, तळामध्ये एक, माणगावमध्ये सहा, म्हसळामधील दोन योजनांचा समावेश आहे. या तलावांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पाण्याचा तुटवडा अनेक गावांना निर्माण झाला आहे. या तलावांमध्ये सध्या 20.53 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर नागरिकांनी योग्य पद्धतीने करावा, असे आवाहन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
जलसाठा क्षमता शिल्लक
अलिबाग – 0.708 0.177
कर्जत -2.153 0.736
खालापूर – 1.8 0.354
रोहा – 0.882 0.221
माणगाव – 0.85 0.255
मुरुड – 0.671 0.134